" हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ "

(ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले भालचंद्र नेमाडे यांचं ६०३ पानांचं अतिशय गाजलेल पुस्तक.)

खरंतर भालचंद्र नेमाडे यांची पुस्तकं वाचायला सुरवात करायला मला स्वतःलाच तसा खूप उशिरच झाला. असं वाटत होतं की मी शाळेच्या शेवटी किंवा कॉलेज सुरू होण्याआधी नेमाडेंची पुस्तकं मला वाचायला मिळायला पाहिजे होती. हिंदू हे पुस्तक माझ्या वाचनाच्या यादीत खूप दिवसांपासून होतं. यापूर्वी त्यांची कोसला ही कादंबरी वाचली होती. तेव्हापासून त्यांच्या लिखाण शैलीच्या प्रेमातच पडलो. त्यानंतर हिंदू हे पुस्तक खूप प्रकर्षाने वाचायची इच्छा झाली होती. हिंदू सारखी कादंबरी वाचणं म्हणजे खरंच एक आव्हानच आहे.


हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ - Hindu Book Review In Marathi
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ - Hindu Book Review In Marathi 


मी जेव्हा हे पुस्तक वाचत होतो तेव्हा असं वाटतं होतं की या पुस्तकातील संपूर्ण कथानक मी खंडेरावच्या दृष्टिकोनातून जगतोय. या पुस्तकामध्ये अनगिनत लोकांची कथा सांगितलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, या पुस्तकात प्रकरणं जरी बरीच असली तरी पुस्तक ३ भागात मांडल्या सारखं वाटतं. जसं सुरवातीला स्वातंत्र्य पूर्वीचा काळ म्हणजेच ब्रिटिश काळ मांडला आहे. पुढे जसं जसं पुस्तक वाचत जातो तसं तसं यात फाळणी झालेल्या काळाचं देखील वर्णन आहे म्हणजेच भारत स्वंतत्र होण्या दरम्यानचा काळ मांडला आहे. मग येतो तो भारत स्वंतत्र झालेल्या काळाचे वर्णन. आणि या संपूर्ण पुस्तकात या तिनही काळांच्या दरम्यान या ऐतिहासिक काळात संपूर्ण भारतात तसंच हिंदू संस्कृतीमध्ये कुठे कुठे काय काय बदल होत गेले या सगळ्यांची अगदी तपशीलवार माहिती या पुस्तकात सांगीतली आहे.

अर्ध पुस्तक वाचून झाल्यानंतर जस जसं मी पुस्तकाच्या उत्तरार्धात जायला लागलो  तसं माझ्या मनात एक विचित्र भावना येयला सुरवात झाली. माहीत नाही काय होतं ते, म्हणजे ती भावना अगदी शब्दात नाही मांडू शकत मी. म्हणजे असं वाटतं होतं की सुरवातीपासून आत्तापर्यंत हे पुस्तक एवढं वाचलं आहे तरीसुध्दा अजूनही काहीतरी एखादी महत्त्वाची गोष्ट आहे या पुस्तकात जी माझ्याकढून अजूनही गहाळ आहे, किंवा माझ्या नजरेत आली नाहिये का ती गोष्ट असं वाटत रहात होतं. असं वाटतं होतं की ती गोष्ट माझ्या सोबतच माझ्या आजुबाजूलाच आहे पण ती गोष्ट माझ्या हातातून म्हणजेच खंडेरावच्या हातातून सुटत चालली आहे की काय असच भास होतं होता. कदाचित excitement मध्ये मी पुस्तक वाचताना खूप घाई केली म्हणून तर असं वाटतं नसेल ना.

तर या कथेतला आपला मुख्य नायक अर्थातच खंडेराव जो पुरातत्व शास्त्राचा विद्यार्थी आहे आणि पाकिस्तानमधील पुरातत्व स्थळावर काम करत आहे, सोबत मोहनजोदड़ो सिंधू संस्कृतीच्या दृष्टिकोनातून तपशीलवार माहिती देत कथेची सुरवात केली आहे. खंडेराव तिकडे काम करत असताना सोबतच फाळणीच्या काळात पाकिस्तानात अडकलेल्या त्याच्या आत्याचा देखील तो शोध घेत असतो. त्याच्या कामाच्या दरम्यानच त्याला कळते की त्याच्या वडिलांचं महाराष्ट्रातील मोरेगाव या मूळ गावी निधन झालं आहे. हे कळल्यानंतर तो तात्काळ गावी जायला निघतो. तर अशा प्रकारे खंडेरावाचा पाकिस्तानातील लाहोर ते महाराष्ट्रातील मोरेगाव पर्यंतचा प्रवास सुरू होतो आणि या प्रवासातून खंडेराव आपल्याला पुरातत्त्वीय पूर्वजांच्या मुळाशी परत घेऊन जातो आणि आपली वंशावळी पानिपतपासून कशी सुरू झाली इथपर्यंत त्याचे पूर्वज मोरेगावला देखिल कसे आले हे सुद्धा तो आपल्याला सगळं कथेतून उलगडून तपशीलवार सांगू लागतो.

एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या गावात वाढलेल्या खंडेरावच्या बालपणीच्या आठवणी आणि सोबतच ग्रामीण जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा शेतकरी हा मुळातच राष्ट्राचा कणा कसा असतो, या सर्व आठवणीतून खंडेराव आपल्याला हे सगळं सविस्तर सांगत असतो. भालचंद्र नेमाडे यांनी या कथेतून आपल्याला शेतकर्‍यांच्या जीवनाचा ज्या प्रकारचा सविस्तर तपशील दिला आहे तो सविस्तर तपशीलच हे पुस्तक उलट आणखीन जास्त अप्रतिम बनवितो. आपल्या भारतीय महाराष्ट्रातील गावांतील खेड्यापाड्यांतील दैनंदिन जीवनाविषयी असा सविस्तर तपशीलवार गोष्टी गोळा करण्यासाठी ज्या प्रकारे नेमाडेंनी संशोधन केले असेल किंवा स्वतः ते अनुभव घेतले असतील तर ते खरंच मनाला चटका लावणारे आहे.

आता मी स्वतःही मूळचा गावाकडचाच  आहे, माझे वडील मुळ चे परभणी  कडेच आणि तिथ वडिलांचं देखील वडिलोपार्जित जुनं घर आहे, म्हणजेच आजोबांच. तिकडे खुप क्वचितच जाणं होतं, कारणं शिक्षण नोकरी मुळे सगळेचजण शहराकडे जिकडे तिकडे विभागलेले आहेत, सध्या गावी तिकडे कोणी रहात नाही. पण त्या घरात एक खोली आहे ज्यामध्ये काही खुप जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत, मला वाटतं निदान भारतातल्या तरी प्रत्येक गावाकडील घरांमध्ये अशी एक खोली असतेच जिथे अशा गोष्टी ठेवल्या जातात जे आपण फेकून ही देऊ शकत नाही आणि त्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात देखील वापरू शकत नाही, परंतु असं असुन सुद्धा त्या गोष्टींसोबत आपण भावनिकदृष्ट्या इतके जोडले गेलेलो असतो, इतक्या आठवणी त्या गोष्टींसोबत जोडल्या गेलेल्या असतात की आपण त्या गोष्टी फेकून देऊच शकत नाही. त्या गोष्टी आपण तसंच संभाळून ठेवत राहतो. हे पुस्तक वाचताना मला अगदी त्या घरातील त्या खोलीला भेट दिल्याची अनुभूती आली. कारण जर तुम्ही स्वतः जर ग्रामीण भागात राहिलेले असाल ना तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या अनेक आठवणींना नक्कीच उजाळा देईल. मग कदाचित त्या चांगल्या आणि वाईट दोन्हीही आठवणी असतील.

आपल्या प्रत्येकालाच बरेचदा हा प्रश्न पडला असेल की आपल्या पूर्वजांचा शोध कसा लागला असेल ? आणि खंडेराव नेमकं तेच करतो. तो त्याच्या आठवणींना भेट देऊन, त्याचा भूतकाळ आपल्यासमोर पुन्हा जिवंत करतो आणि या सगळ्यातच पूर्वजांच्या शोधाचं देखील उत्तर मिळतं. ज्यांना हिंदूचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे, ते समजून घ्यायचं आहे, त्यांना मला फक्त एवढंच सांगावस वाटतयं की पहिले भालचंद्र नेमाडे यांना समजून घ्या. हिंदूकडे जाण्यापूर्वी त्यांची आधीची एखादी रचना वाचा. मी हिंदू च्या आधी कोसला वाचलं आहे आणि त्यामुळे नेमाडे यांच्या साहित्य शैलीची मला थोडीशी जाणीव आली होती. हिंदू हे पुस्तक खरंच एक विलक्षण अनुभव आहे, परंतु जर तुम्ही नेमाडेंची पूर्वीची एखादी रचना वाचलेली नसेल तर लगेच हिंदू वाचायला सुरू करू नका, मी हेच म्हणेन की पहिले त्यांच्या आधीच्या एखाद्या पुस्तकाला नक्कीच भेट द्या आणि नंतर ही उत्कृष्ट रचना वाचायला सुरू करा.

थोडक्यात हिंदू हा खरंतर नायक खंडेराव, त्याच कुटुंब, त्याचे मित्र आणि त्याचे सहकारी, त्याचे अनुभव, त्याचे विचार या सर्व गोष्टींशी संबंधित विविध कथांवर आधारित एक डॉक्युमेंटरी सारखा प्रकार आहे. हिंदू धर्माच्या समृद्ध संस्कृतीचे आणि जीवनशैलीचे तपशीलवार वर्णनात्मक पुरातत्व विद्यार्थ्याच्या प्रवासात विणलेले हे पुस्तक आहे. हे एक खरंच कमाल आकर्षक वाचन आहे. हिंदू हे त्याचे वेगळेपण, तपशीलवार निरीक्षण आणि ग्रामीण महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा असलेले वर्णन यासाठी वेगळं आहे.

आर्यांच्या आगमनाने सिंधूच्या काठावर एक नवीन सभ्यता दिसली. शतकानुशतके स्थापन झालेली ही हिंदू संस्कृती खोलवर रुजली आणि कालांतराने भारतीय उपखंडात पसरली आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्याचा परिणाम झाला. ही सभ्यता स्थिर राहिली आहे. वेगवेगळ्या सामाजिक संरचनेच्या बदलत्या गरजांशी ती स्वत:शी जुळवून घेत आहे आणि विचारांच्या अखंड प्रवाहाने समृद्ध देखील होत आहे. जरी मूलभूत वैचारिक रचना स्थिर राहिली असली तरी, विचारांच्या प्रत्येक नवीन लाटेला आत्मसात करण्याच्या क्षमतेने एक अविश्वसनीय समृद्ध सांस्कृतिक पोत तयार केला आहे जो सामाजिक परंपरांपासून परस्पर संबंधांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम करतो. या बहुवचन सभ्यतेचा तिच्या सामर्थ्यपणाचा सर्वव्यापी प्रभाव आपले जीवन सतत समृद्ध करतो. हाच समृद्ध करणारा संघर्ष हिंदू पुस्तकाचा कॅनव्हास तयार करतो.

हिंदू हे पुस्तक फक्त हिंदू धर्मा बद्दलच नाहिये, तर हिंदू म्हणजे आपल्या भारतातून जे काही निघालं आहे ते सगळं, म्हणजे उत्खनन, संस्कृती, धर्म, रूढी, परंपरा, जात, समाज, चालीरीती, ग्रामीण संस्था, एकत्र कुटुंब, जातीव्यवस्था, रोगराई मुळे गावात झालेले बदल, शेती, शेतकरी, फाळणीपूर्व जिवन तसेच फाळणीच्या दरम्यानचा काळ फाळणीनंतर पसरलेली लोकं, भाषा, नातेसंबंध, शिव्या, भावना इत्यादी सर्व. या सगळ्यांबद्दल या पुस्तकात सखोल लिहिलं आहे. मला वाटतं अगदी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातली अशी एकही गोष्ट नाही जी या पुस्तकात नसेल. या पुस्तकात जास्तीत जास्त विषय हाताळले गेले आहे.

या पुस्तकात गावाकडचं जे वर्णन केलं आहे, म्हणजे त्या काळातील वर्णन ते एकदम कमाल आहे, असं वाटतं खंडेराव आणि आपण एकत्र डोळ्यासमोर एखादा जिवंत चलचित्रपट पाहतोय. एका गावात, एका शहरात, एका राष्ट्रात, एका देशात  कित्येक धर्म संस्कृती आहेत, असं असूनही हे सगळं एकमेकांना कसं जोडलं गेलेलं आहे हे ही या पुस्तकात सांगीतलं आहे. तसचं आपली जी मूळ संस्कृती आहे ती समाज, भांडवल, जागतिकीकरण, विलगीकरण इत्यादी कारणांमुळे कसं हरवत चाललं आहे हे देखील यात सांगीतलं आहे.

या कथेची रचना एखाद्या loop प्रमाणे आहे. म्हणजे एका कथेत दुसरी कथा, दुसऱ्या कथेत तिसरी कथा आणि तिसऱ्या कथेपासून पुन्हा पहिल्या कथेवर शेवट. या पुस्तकातील कथेत असंख्य पात्र आहेत असं असुनही लेखकाने प्रत्येक पात्रांची स्वतंत्र कथा मांडली आहे. ही कादंबरी एका महाकाव्याच्या रीतीने जीवनाची विशालता आणि बहुलता टिपते. मनापासून समाधान देणारे वाचन आहे हे. हे पुस्तक प्रत्येक वाचकाला जीवनाच्या अनेक पैलूंचे पुन्हा परीक्षण करण्यासाठी नक्कीच आमंत्रित करेल असं मला वाटतं.

हे पुस्तक वाचणं म्हणजे भाषेनुसार, विचारांनुसार सामग्रीनुसार एक आश्चर्यकारक अनुभव आहे. काहीजण म्हणतील की या कथेची भाषा, शब्द, विचार खूप अवघड आहे आणि कथा कुठेही जात नाही किंवा गुंतागुंतीची वाटते. परंतु माझ्यावर विश्वास ठेवा हे तथाकथित शुद्ध मराठी बद्दलचे अमर्यादित ज्ञान आहे. हे पुस्तक आपल्याला ग्रामीण महाराष्ट्राच्या अफाट समृद्ध सांस्कृतिक खजिन्याच्या उद्बोधक प्रवासात घेऊन जाते. लेखक जीवनातील अनेक पैलूंवर वेगवेगळ्या अनुभवांतून आपली मते मांडतात आणि सोबत त्या अनुभवांना थोडा तर्क वितर्कांचा आधार देखील दिला आहे.  येथे सकारात्मक गोष्ट अशी आहे की किमान त्यांनी अनेक गोष्टी (लेखक, तथाकथित सामाजिक शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी) पूर्वी वैश्विक सत्य म्हणून गृहीत धरलेल्या किंवा स्वीकारलेल्या संस्कार आणि चालीरीती वादाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न तरी केला. जरी यांतील काही गोष्टी युक्तिवाद आणि काही मते आव्हानात्मक आहेत, तरीही प्रत्येकाची निवड ही निश्चितच भिन्न असूच शकते. त्यामुळे यातील गोष्टी स्वीकारायचे की ते criticize करायचं हे ज्याची त्याची वयक्तिक निवड आहे. त्यामुळे सारांश देताना मी हेच सांगू शकते की, हे एक चांगले, वाचनीय पुस्तक आहे जे आपला वेळ कदापि वाया घालवणार नाही.

भालचंद्र नेमाडे हे नेहमीच आपल्या विस्मयकारक शैलीत लिहितात, हिंदू धर्माचा गौरवशाली भूतकाळ उलगडून दाखवतात, पण काही ठिकाणी धर्मावर टीका करायला देखील मागेपुढे पाहत नाही हे देखील आहेच. त्यांचे लेखन हिंदू धर्माच्या सर्वांना प्रवाहात घेऊन जाण्याच्या या जुन्या स्वभावाचे यथायोग्य वर्णन करते. यात दाखवलेला शेतकरी कुटुंबाचा संघर्ष जो खेड्यातील बहुतेक शेतकऱ्यांची कथा परिभाषित करतो. ही कलाकृती लिहिण्यासाठी त्यांनी अनेक दशके अभ्यास केला असणार यात आश्चर्य नाही. प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवं.

हे पुस्तक, यातील काही पात्रांचा संघर्ष वाचल्यानंतर फक्त मलाच काय अगदी तुम्हालाही अन् प्रत्येकाला हे वाटायला लागेल की आजचं आपलं जीवन खरंच खूप सुखी समाधानी आहे आणि आपण खूप नशीबवान आहोत.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने