RRR MOVIE REVIEW IN MARATHI
![]() |
RRR MOVIE REVIEW IN MARATHI |
काही दिग्दर्शक असे असतात की ज्यांचं फक्त नाव आपल्याला चित्रपटगृहात ओढून न्यायला पुरेसं असतं. तेलुगू सिनेसृष्टीत एक असे दिग्दर्शक आहेत ज्यांचं फक्त नावच पुरेसं आहे. आणि ते नाव आहे एस एस राजामौली. राजामौली दिग्दर्शित RRR हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आजचा लेख त्याबद्दल आहे.
RRR MOVIE कथा आहे दोन वेगवेगळ्या व्यक्तींची, रामराजू आणि भीम. मल्ली या आदिवासी मुलीला स्कॉट हा ब्रिटिश अधिकारी जबरदस्तीने आपल्या सोबत घेऊन जातो. मल्लीला सोडवायला भीम हा अख्तर या नावाने दिल्लीत येतो. तिथेच त्याची भेट रामराजू याच्याशी होते. ह्या रामराजूला ब्रिटिश पोलीस सेवेत स्पेशल ऑफिसर या पदी नियुक्त व्हायचं असतं आणि त्यासाठी तो कुठल्याही थराला जायला तयार असतो. हे दोन विरुद्ध हेतू असलेले व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं ? त्यांचे हेतू पूर्ण होतात का ? त्यांना एकमेकांचे छुपे सत्य कळते का ? ही या चित्रपटाची पुढील कथा आहे.
चित्रपटाची कथा के वी विजेंद्र प्रसाद यांची आहे तर पटकथा लिहिली आहे एस एस राजामौली यांनी आणि संवाद लिहिले आहेत रिया मुखर्जी यांनी. लेखन या विभागाला मी फुल्ल मार्कस देऊ इच्छितो. राजामौली यांच्या सिनेमाचं नेहमीच एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे चित्रपटाची कथा कितीही सरळ असू द्या, त्याची पटकथा ही नेहमी उत्कंठावर्धक असते व संवादही खूप ताकदीचे असतात.
अल्लुरी सितारामराजू आणि कोमारम भीम हे दोन क्रांतिकारी सशक्त क्रांतीत येण्याआधी ३-४ वर्ष कुठे होते हे कुणालाच ठाउक नाही. या कालखंडात RRR या चित्रपटाची कथा घडते. ऐतिहासिक पात्रांना घेऊन कल्पानिक कथा रचणे सोपं नाही. पण राजामौली यांनी हे शिवधनुष्य खूप उत्तमरीत्या पेललं आहे आणि त्यात ते यशस्वी देखील झाले आहेत. इंग्रजांनी भारतीयांवर केलेले अत्याचार, त्यांची शोषण करण्याची मानसिकता, त्यांचे भारतीयांबद्दल असलेले तुच्छ विचार ह्या सर्व गोष्टी देखील पटकथेत व्यवस्थित मांडल्या आहेत .
तसच मल्लीचं अपहरण, राम आणि भीमची भेट, भीमचे मल्लीला सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, रामचा भूतकाळ इत्यादी सर्व गोष्टी खूपच रंजकतेने पटकथेतून आपल्याला दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाची लांबी जरी तीन तास असली तरी चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकही क्षण कंटाळवाणा नाहीये. ही एस एस राजामौली यांच्या लेखन - दिग्दर्शन प्रतिभेची कमाल आहे.
या चित्रपटाचे संवाद देखील खूपच जबरदस्त आहेत. विशेषतः फ्लॅशबॅक दृष्यांमधील संवाद. " जान से भी प्यारी तुम्हारी दोस्ती हमेशा होगी. खुशी खुशी कुर्बान हो जाऊंगा.", " भीम, इन टुच्चे राक्षसो को छोड, महासुर का संघार करना है, आ!!!" ," अपनी जंग ढूंढ़ते हूए हथियार खुदबखुद आयेंगे" हे संवाद सिनेमा संपल्यावर देखील तुम्हाला लक्षात राहतात. जशी जादू मनोज मुंतशिरच्या संवादांनी बाहुबली मध्ये केली होती तशीच जादू इथे रिया मुखर्जीच्या
संवादांनी केली आहे.
संगीत व पार्श्वसंगीताची धुरा एम एम क्रीम यांनी सांभाळली आहे तर रिया मुखर्जी आणि वरुण ग्रोव्हर यांनी गीत लेखन केले आहे. सिनेमाचं पार्श्वसंगीत जितकं कडक आहे, तितकीच मधुर व श्रवणीय चित्रपटातील गाणी आहेत. विशेषतः जननी आणि नाचो नाचो ही गाणी फारच उत्कृष्ट आहेत. दोस्ती आणि कोमुरम भीमुडू या गाण्यांचे शब्द खूपच सुरेखरीत्या चित्रपटाच्या कथेला पुढे नेतात. चित्रपटातील एकही गाणं वगळण्यासारखे नाही.
के के सेंथील कुमार यांचे छायाचित्रण खूपच नयनरम्य आहे. स्लो मोशन आणि अँक्शन दृश्यांमध्ये त्यांचा कॅमेरावर्क उल्लेखनीय आहे. तसेच साबू सिरील यांचे प्रॉडक्शन डिझाइन आंतरराष्ट्रीय स्तराचे आहेत. बाहुबली सारखेच इथेही सेट्स खूपच लक्षवेधी आहेत. ए श्रीकर प्रसाद यांचं एडिटिंग आणि वी श्रीनिवास मोहन यांचे व्हिज्युअल इफेक्ट्स खूपच खास आहे. चित्रपट नीट पाहिला की कळतं, की ४०० कोटी रुपये कुठे खर्च झाले आहेत ते.
या चित्रपटामधील साहसदृष्ये म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच आहे. काही लोकांना या चित्रपटातील साहस दृश्य जरा ओव्हर द टॉप वाटतील, पण राजामौली यांच्या सिनेमात हे दृश्य फारच विलक्षण असतात. रामचरण आणि ज्युनिअर एन टी आर यांच्या पात्रांची ओळख ज्या दृश्यांमधून होते ते खूपच खास आहेत. मध्यांतर पूर्वीचा दृश्यही छान जमून आलाय. शेवटच्या अर्धा तासात ज्या फाइट्स आहेत त्या देखील तुम्हाला शीळ वाजवायला भाग पाडतात.
आता आपण अभिनय या विभागाकडे वळूया. सुरुवात करुया ज्युनिअर एन टी आर (तारक) कडून. तारकने या चित्रपटात भीम ही भूमिका साकारली आहे. मल्लीला वाचवण्यासाठी धडपडणारा, आपल्या निरागसतेने राम आणि जेनीचे मन जिंकणारा, रामसाठी आपला प्राण पणाला लावणारा भीम त्याने खूपच सुरेख साकारला आहे. भावनिक तसेच साहस दृश्यांमध्ये चेहऱ्यावरील हावभाव तो इतक्या सहजतेने बदलतो की त्याची स्तुती केल्याशिवाय राहवत नाही. राजामौली एकदा म्हणालेले की तारक त्यांचा सर्वात आवडता नट आहे, ते असं का म्हणाले हे चित्रपट पाहिलं की कळतं.
रामचरण याने रामराजू ही भूमिका साकारली आहे. ज्या दृश्यात हा रामराजू आपल्या समोर येतो तो दृश्य पाहण्याजोगा आहे. रामची तगमग, त्याच्या मनातील जुन्या आठवणी, सतत काहीतरी मिळवण्याचे स्वप्नं, भीमवर असलेले त्याचे प्रेम आणि आपल्या कर्तव्याबद्दल असलेली जाण ह्या सर्व गोष्टी रामचरण याने खूपच उत्तमरीत्या व्यक्त केल्या आहेत. तसं मी तारकचा चाहता आहे, पण मला असं वाटतं इथे रामचरण भाव खाऊन गेलाय. त्याच्या पात्राचा ग्राफ जास्त विविध छटा असलेला आहे आणि ते चारणने खूप छान व्यक्त केले आहे.
अजय देवगण यांनी वेंकट रामा राजू ही भूमिका साकारली आहे. कमी स्क्रीन टाईम मध्ये देखील आपला प्रभाव पाडण्यात देवगण इथे यशस्वी झाले आहेत. त्यांचा पात्राचा शेवटचा दृश्य तर लाजवाब झाला आहे.श्रिया सरण हिने सरोजिनी ही भूमिका साकारली आहे. आपण किती सशक्त अभिनेत्री आहोत हे श्रियाने आपल्या डोळ्यातील भावातून दाखवले आहे.
रे स्टीवनसन याने ब्रिटिश गव्हर्नर स्कॉट ही भूमिका साकारली आहे तर एलिसन डूडी हिने स्कॉटच्या बायकोची म्हणजेच कॅथरीनची भूमिका साकारली आहे. ह्या दोघांचा अभिनय इतका जिवंत आहे की जेव्हाही हे दोघं परद्यावर येतात तेव्हा आपल्याला अनाहूतपणे त्यांचा राग येतो. क्रूर आणि विकृत ब्रिटिश दाम्पत्य, स्कॉट आणि त्याची पत्नी हे दोन पात्र दोघंही कलाकारांनी अगदी जीव तोडून निभावले आहेत.
आलिया भट्ट हिला सीता ही भूमिका मिळाली आहे आणि तिने आपलं काम छान केले आहे. तिचं पात्र महत्वाचं जरी असलं तरी त्यात अभिनय दाखवण्यासाठी काही जास्त वाव नाहीये. ऑलिविया मॉरिस हिने साकारलेली जेनी आपल्या लक्षात राहते. तिच्या सौंदर्या इतकच तिचा स्क्रीन प्रेसेन्स जबरदस्त आहे.
सिनेमातले बाकी कलाकार जसे समुथीरिकानी, छत्रपती सेखर, मकरंद देशपांडे, राहुल रामकृष्णा, एडवर्ड सोनेबिक, स्पंदन चतुर्वेदी, मार्क बेनिंग्टन, इत्यादी सर्व लहान कलाकारांनी खूपच मेहनतीने साकारले होते. एक्सट्रा कलाकारांनी देखील छान साथ दिली आहे.
जर तुम्ही राजामौली यांचे आधीचे सिनेमे पाहिले असतील तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. ती म्हणजे, क्राउड सीन हे त्यांच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. सई, मगाधीरा, बाहुबली या चित्रपटांमध्ये जसे क्राउड सीन्स आपलं मन जिंकतात, तसेच इथेही रामचरणचा जो इंट्रोडक्शन सीन आहे , तो निव्वळ अप्रतिम आहे. ते दृश्य पाहताक्षणी जरी अतिशयोक्ती वाटत असलं तरी त्याला आत्मविश्वासाने सादर करणं ही दिग्दर्शकाची कमाल आहे. तसच चित्रपट जेव्हा सुरू होतो तेव्हा RRR या तीन अक्षारांची आपल्याला एकाहून एक जबरदस्त दृश्यांमधून (द स्टोरी, द फायर आणि द वॉटर) ओळख होते.
राजामौली एकदा असे म्हणाले होते, “In theory, I know that if you have a universal theme and a good story told well, it will work everywhere.” RRR MOVIE चं देखील असच काही आहे. आधी सांगितल्याप्रमाणे या चित्रपटाची कथा खूप साधी आहे पण या चित्रपटाचं यश आहे ते त्याच्या भव्यदिव्य पण convincing सादरीकरणात.
तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर नक्की मला आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.