दक्षिण अभिनेत्री सौंदर्याचे साैंदर्य
एखादी अभिनेत्री तिच्या सौंदर्याने आपल्याला मोहिनी घालते आणि आपल्याला ती आवडते. पण बाह्य रूपाने आणि मनानेही नावाप्रमाणे सुंदर असलेली, एक काळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सौंदर्या.जी सातत्याने टिव्ही चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या सूर्यवंशम या हिंदी सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांची हिरोईन म्हणून महाराष्ट्रातील सिने रसिकांना माहीत आहे.
![]() |
south-actress-soundarya |
2003 मध्ये पुण्यातील वेंकिज कंपनीच्या पोल्ट्री उद्योगासाठी उपयुक्त असलेल्या उत्तरा फिडस या पशुखाद्यची जाहिरात स्वरूपात डॉक्युमेंटरी करण्याचे काम मला मिळाले.ही डॉक्युमेंट्री फिल्म तेलुगू भाषेत करायची असल्याने माझ्यासाठी ते एक आव्हान होते त्याआधी याच कंपनीसाठी मी मराठी हिंदी जाहिराती केल्या होत्या पण जी भाषा आपल्याला बोलता येत नाही समजत नाही त्या भाषेत काम करायचं ,आपल्याला जमणार कसं हा प्रश्न मला पडला.पण पाण्यात पडल्या शिवाय पोहता येत नाही म्हणतात तसं मीही मनाची तयारी केली आपल्याला हे जमेलच. डॉक्युमेंट्री फिल्म मी मराठीत लिहिली आणि मग तेलुगू भाषेत भाषांतर करून घेतली.त्यामुळे वाक्याचे अर्थ समजणे सोपे गेले.
या फिल्मसाठी कंपनीने काहीही झालं तरी साऊथची हिरोईन सौंदर्या हिलाच घ्यायचे ठरवले.कारण सौंदर्या तेलुगू बरोबरच तमिळ कन्नड मल्याळम चित्रपटांमध्ये काम करीत असल्याने ती सगळीकडेच लोकप्रिय होती. त्याकाळातील साऊथ मधील सर्वच स्टार सुपरस्टार हीरोंच्या बरोबर हिरोईन म्हणून तिने काम केले होते.
कंपनीच्या वतीने सौंदर्याचा भाऊ अमरनाथ जो तिचा मॅनेजर म्हणून काम पाहत असे त्याच्याशी संपर्क झाला. त्याने एक बजेटचा आकडा सांगितला तो ऐकून सौंदर्या परवडणारी हिरोईन नाही याचा अंदाज कंपनीच्या लोकांना आला. तरी शेवटचा एक प्रयत्न म्हणून त्यांनी डायरेक्टर म्हणून जर मी स्वतः सौंदर्या बरोबर बोललो तर थोडं वजन पडेल असं वाटून मला मध्यस्थी करण्यास सांगितले.
माझ्या ’आधार’ सिनेमात साऊथ अभिनेत्री जयाप्रदा यांनी काम केले होते त्यांच्याशी ओळख असल्याने त्यांना मी घडलेला सगळा प्रकार सांगितला. जयाप्रदा यांनी मला त्यांच्या नावाचा संदर्भ ओळख सांगून सौंदर्या बरोबर बोलण्याचा सल्ला दिला.
सौंदर्या बरोबर माझे बोलणे झाले तेंव्हा मी तिला जयाप्रदा यांची आणि माझी ओळख असल्याचे सांगून जयाप्रदा यांनी माझ्याकडे मराठीत काम केले असल्याचे सांगितले. आणखी प्रभाव पडावा म्हणून अक्षयकुमार यानेही माझ्या सिनेमात काम केल्याचे सांगितले. माझं सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर " महेशजी आपने खुद होकर फोन किया हैं मुझे आपके बारेमे कुछ भी पता नंही था. जयाप्रदाजी ने आपके साथ काम किया है तो मुझे भी आपके साथ काम करनेका मौका मिस नहीं करना चाहिए” असं सांगून जे कंपनीला परवडेल त्या बजेट मध्ये काम करायला सौंदर्या तयार झाली.माझ्या प्रयत्नांना यश आल्यामुळे मला आनंद झाला.बॉलिवूड पेक्ष्या साऊथच्या कलाकारांना चित्रपटात काम करण्याचे जास्त पैसे मिळतात आणि जाहिरातीत तर त्याहून अधिक पैसे मिळतात.
सौंदर्या सातत्याने मद्रास हैद्राबाद येथे शूटिंगमध्ये बिझी होती त्यामुळे आम्हाला सहजपणे तिची तारीख मिळेल असं वाटत नव्हतं. तीन दिवसांसाठी ती बेंगलोरला तिच्या फॅमिलीला भेटायला येणार असल्याने तेंव्हाच एका दिवसात तिचे शूटिंग करावे लागणार होते कारण नंतर ती परदेशात शुटींग साठी जाणार असल्याचे समजल्यामुळे तिच्या तारखा मिळणे अवघड होते.
बेंगलोर पासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या एका गावात शुटिंग ठरले.पोल्ट्री फार्म असल्यामुळे तिथे फारशा सुविधा नव्हत्या पण जवळच एक झोपडी होती. सौंदर्या त्या छोट्या घरात शुटिंगसाठी तयार झाली.साऊथ मध्ये काम करताना मला एक नवीन अनुभव आला की तिथले कलाकार, तंत्रज्ञ वेळेच्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीत खूपच प्रामाणिक असतात.महाराष्ट्रात शुटिंगला पोचल्यावर नाश्ता झाला की कामाला सुरुवात होते.पण आम्ही शूटिंग करताना तंत्रज्ञांनी आणि सौंदर्यानेही मला सांगितले की पहिला शॉट झाला की मगच आम्ही नाश्ता करतो. कामाला असं महत्व देणारी माणसं पाहून मलाही त्यांचे कौतुक वाटले.
सौंदर्या बरोबर काम करत असताना कुठंही तिने मला जाणवू दिले नाही की ती किती मोठी स्टार आहे.उलट ती नवीन कलाकार आणि मी साऊथ मध्ये काम केलेला अनुभवी दिग्दर्शक असल्या सारखं ती माझ्याशी वागत होती.अर्थात हा तिचा मोठेपणा होता.शुटींग दरम्यान आमच्या गप्पा चालूच होत्या.तिथले निर्माता दिग्दर्शक आणि चाहते यांना कलाकार नेहमी आपला ’अन्नदाता' म्हणून आदर देत असतात.कामाच्या ठिकाणी कडक शिस्त असते.प्रत्येकजण वेळ आणि दिलेला शब्द पाळतो.आणि नाही पाळला तर सर्व निर्माते दिग्दर्शक एकत्र येऊन त्या कलाकारावर बहिष्कार घालतात जेणे करून तो कलाकार वठणीवर येईल.असाच एक किस्सा सौदर्याने मला सांगितला की त्यांच्या चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्रीला एका हिंदी सिनेमाची ऑफर आली पण आधीच एका साऊथ फिल्मसाठी तिने तारखा दिल्या होत्या आणि तिला हिंदी सिनेमात काम करण्याची संधी सोडायची नव्हती. मग तिने साऊथ फिल्मसाठी दिलेल्या काही तारखा हिंदिसाठी दिल्या आणि साऊथ फिल्मचे शुटिंग करताना मग कामाच्या ठिकाणी घाई करणे,तारखा देऊनही ऐनवेळी हिंदी फिल्मच्या शुटिंगसाठी मुंबईला निघून जाणे असे नखरे सुरू केले.एके दिवशी ती हिरोईन साऊथ फिल्मच्या शुटसाठी सेटवर आली असता निर्माता दिग्दर्शकाने तिला तिथेच सर्वांसमोर सांगितले की तिला सिनेमातून काढून टाकण्यात आले आहे. अर्ध्याहून जास्त शूटिंग झाले असतानाही निर्माता दिग्दर्शक यांनी आधीची हिरोईन बदलून दुसरी हिरोईन घेतली.
असे काही किस्से सांगत आमच्या गप्पा चालू असताना सौंदर्याने मला ’छाला बागुंदी’ हा तेलुगू शब्द शिकवला आणि मी तिला ’खूप छान’ हा मराठी शब्द शिकवला.त्यामुळे शॉट ओके झाला की ती मराठीत खूप छान म्हणत माझं कौतुक करायची.
दुपारी लंच ब्रेक झाला तेंव्हा बाहेर आम्ही पाहतो तर सौंदर्या शुटिंगसाठी आलीये हे समजल्यामुळे गावातील लोक जमा झाले होते.ती जमलेली प्रचंड गर्दी,"अम्मा अम्मा" करत सौंदर्याला पाहण्यासाठी धडपडणारे चाहते पाहून मीही थक्क झालो.
काहीजण तिला पाहून दोन्ही हात जोडत होते.मी सौंदर्याला जेवण करायचं का? असं विचारल्यावर तिने मला उत्तर दिले ”महेशजी जिनके वजहसे मै रोटी खाती हुं पेहले उनको तो मिलकर आती हुं" असं म्हणत सौंदर्या त्या गर्दी समोर जाऊन त्यांना भेटली.आल्यावर त्या पोल्ट्री फार्म मध्ये पोत्यांवर बसून हातात ताट घेऊन आम्ही एकत्र जेवताना तिने आणखी एक धक्कादायक खुलासा केला की तिचे चाहते देवाच्या फोटो बरोबर घरात तिचे फोटोही लावतात आणि त्याची पूजाही करतात.साऊथचे कलाकार लोकांसाठी सातत्याने मदतीचा हात देत असतात असे सौंदर्याने मला सांगितले.आमचे शूटिंग वेळेत संपले, निघताना सौंदर्याने दुसऱ्या दिवशी मला घरी जेवणाचे आमंत्रण दिले.
घरी जेवायला गेल्यावर माझ्या सारख्या नवीन दिग्दर्शकाचा तिने केलेला पाहुणचार मी कधीच विसरू शकत नाही.पुन्हा एकदा आमचा एकत्र काम करण्याचा योग येणार होता पण दुर्देवाने राहूनच गेला.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ती हैदराबादला जाणार असल्याचे तिने सांगितले आणि मग तिथून आल्यानंतर नवीन एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी तारखा फिक्स करू असं तिने मला सांगितले.
चार एक दिवस झाले असतील दुपारी जेवत असताना मला माझ्या एका साऊथ इंडियन मित्राने मेसेज करून टिव्ही वर बातम्या बघ म्हणून सांगितले.तसाच उठून टिव्ही वर ब्रेकिंग न्यूज मध्ये बातमी पाहिली. निवडणूक प्रचारासाठी जात असताना सौंदर्याच्या हेलिकॉप्टरला अपघात. हेलिकॉप्टर कोसळले त्यात सौंदर्या,तिच्या भावाचा जळून जागीच मृत्यू झाला. मनाला चटका लावून जाणारी ती बातमी पाहिल्यावर डोळ्यासमोरून सौंदर्याचा चेहरा जाता जात नव्हता.तिचा मृत्यू हा अटळ आणि विधिलिखित होतं असं काही तिच्या नातेवाईक,सहकलाकार यांचे म्हणणे होते.
सौंदर्याच्या जन्मानंतर एका ज्योतिषाने सांगितले होते की ती कमी वयात खूप नाव पैसा कमवेल पण तिला मरण लवकर येईल.कदाचित हे खरंही असेल कारण कमी वयात यशस्वी स्टार होणारी सौदर्या वयाच्या 32 व्यां वर्षी जगाचा निरोप घेते हे एक कटू सत्य नाहीका?
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.