श्रीदेवी बॉलीवुड मधील लेडी सुपरस्टार
![]() |
sri-devi-kapoor |
तिचं सौंदर्य
पाहून घायाळ होणारे
अनेक,तिचा अभिनय
पाहून ती भूमिका
तीच्याचसाठी होती असा
ठाम विश्वास वाटणारे
रसिकही अनेक, तिची विविध
प्रकारची नृत्ये पाहून एकमेव
निपुण नृत्यांगना म्हणजे
श्रीदेवी अशी खात्री
असणारेही अनेक.अनेकांची
आवडती अभिनेत्री श्रीदेवी
हिने स्वतःच्या मेहनतीनं
बॉलीवुड मधील लेडी
सुपरस्टार होण्याचा मान मिळवला.
तिचं वेगळेपण, भोवतालचं
प्रसिद्धीचे वलय,रुबाब
शेवट पर्यंत तिनं
जपला.
माझ्या कार्यक्रमाच्या 500 शो ला
माधुरी दीक्षितने गेस्ट म्हणून
यायचे कबूल केले.
कार्यक्रमाला आठ एक
दिवस बाकी होते,मंगळवार असल्याने मी
आणि माझा असिस्टंट
दोघे सिद्धिविनायक गणपतीच्या
दर्शनाला पोचलो. समोरून लोकांच्या
गराड्यात अडकलेली,
आजूबाजूच्या
लोकांना स्माईल देत काहींना
हात दाखवत चालत
पुढे येणारी श्रीदेवी
दिसली. चित्रपटांमधून श्रीदेवी कमी दिसत
असली तरी तिचा
प्रेक्षक वर्ग अजिबातच
कमी झाला नव्हता.तिची छोटीशी
तरी झलक पाहता
यावी म्हणून दर्शनासाठी हात जोडून
रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना
गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या
आधी श्रीदेवीचे
दर्शन झाल्याचे समाधान
त्यांच्या डोळ्यात दिसत होते.हातातील पूजा साहित्याचं
ताट सांभाळत, टाचा
उंच करून काही
स्त्रिया श्रीदेवी पहाता यावी
म्हणून धडपड करीत
होत्या.जीला ती
दिसली ती दुसरीला
लगेच सांगत होती"पिक्चर मध्ये दिसते
तशीच आहे गं
रंगानं, हसते किती
गोड. एकटीच आलिये
नवरा दिसत नाही
सोबत".
घरी आल्यावर श्रीदेवीला आधी मेसेज केला आणि तिचा रिप्लाय आल्या नंतर मग फोनवर तिच्याशी बोलणे झाले.मी माझी माहिती सांगताच ”महेशजी मैने आपके काम के बारेमे सूना है," तिनं असं सांगितल्यावर मला आशा दिसू लागली.तिच्या घरापासून मी अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर राहत असल्याचे मी सांगितल्यावर "आप तो मेरे पडोसी है" असं ती म्हणाली तेंव्हा बोलायला आणखी हुरूप आला.मी तिला कार्यक्रमाची माहिती देऊन कार्यक्रमाला तिने गेस्ट म्हणून यावं अशी विनंती केली आणि बोलताना जो सहजपणा तिनं दाखवला तितक्याच सहजपणे तिने पटकन होकारही दिला.
कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी आमचं पुन्हा फोनवर बोलणं झालं तेंव्हा तिनं कार्यक्रमाला आल्यावर मराठी बोलावं लागलं तर याचं तिला खूप टेंशन आल्याचं सांगितलं.मी तिला हिंदीत दोन शब्द बोलले तरी चालेल असे सांगताच ”महेशजी आपने बचा लिया मुझे" डोक्यावरचं ओझं कमी झाल्याचा आनंद तिच्या बोलण्यातून जाणवला. बॉलीवुड मध्ये ती नवीन असताना तिला व्यवस्थित हिंदी बोलता येत नसे तरीही तिने हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आणि चित्रपट पाहताना तिच्या बोलण्यातून कधीच ते दिसून आले नाही याचे नक्कीच कौतुक आहे. सिनेमातील हिंदी डायलॉग ती व्यवस्थित हिंदी बोलणाऱ्या व्यक्ती कडून एका कॅसेट मध्ये रेकॉर्ड करून घेत असे आणि मग ते अनेकदा ऐकून त्या पद्धतीने ती शूटिंगच्या वेळी डायलॉग बोलत असे,असं मी इंडस्ट्रीतल्या काही लोकांकडून ऐकले होते.माझ्याशी फोनवर बोलतानाही तिचे हिंदी उच्चार मद्रासी भाषेत बोलल्या सारखे वाटत होते.हेमामालिनी पण अश्याच पद्धतीने हिंदी बोलतात.
संध्याकाळची ट्रॅफिकची वेळ असल्यामुळे अंधेरी मधून कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्रालय परिसरात पोचेपर्यंत श्रीदेवीला दीड तास लागला .कार्यक्रमातील तारकांची नृत्ये पाहून ती एन्जॉय करीत होती.तिच्याच चित्रपटातील गाण्यांवर तारकांनी केलेली नृत्ये पाहून तिला अधिकच आनंद झाला.परत जाताना बॅक स्टेजला येऊन तिने तारकांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले.लिफ्ट मधून आम्ही खाली येत असताना अचानक "अम्मा.. असं म्हणत वेदना सहन न झाल्याने ती पाठ टेकून उभी राहिली.मी चौकशी केल्यावर गेल्या काही दिवसांपासून तिला पाठीचा त्रास सुरू असल्याने एका जागी जास्त वेळ बसून राहीलं की पाठ खूप दुखते असं तिनं सांगितलं.
डॉक्टरांनी तिला आराम करायचा सल्ला दिला होता.मी न राहवून तिला विचारलं की डॉक्टरांनी आराम सांगितला होता तर मला तसे कळवले असते तर मी नंतर पुन्हा केव्हातरी माझा कार्यक्रम पहायला बोलवले असते. माझं बोलणं ऐकून घेतल्यावर ” महेशजी आपको मैने प्रॉमिस किया था आपका शो देखने जरूर आऊंगी. प्रॉमिस तो निभाना पडता है ना” मी मात्र तिचं उत्तर ऐकून भाऊक झालो.इतकी मोठी स्टार अभिनेत्री तिला पाठीचा त्रास होतोय तर मला सांगू शकली असती की तिला कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही पण दीड तास गाडीत बसून,तिला नक्कीच त्रास झाला असणार तो सहन करून ती माझ्या कार्यक्रमाला आली. येऊन निघायची घाई न करता आनंदाने कार्यक्रम पाहिला,चेहऱ्यावर कुठंही तिला होणारा त्रास तिनं दिसू दिला नाही.तिच्या या माणुसकीनं मी मात्र तिचा आणखी जास्तच फॅन झालो. त्यानंतर दोनदा तिच्या घरी जायचा योग आला.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.