डॉ.ऐ पी जे अब्दुल कलाम साहेब सोबत काही क्षण
मला मात्र ती खंत
राहिली की अब्दुल
कलाम साहेब माझा
कार्यक्रम पहायला आले असते
तर अगदी जवळून
भेट झाली असती
त्यांच्याशी बोलता आले असते..
अब्दुल कलाम साहेब
यांच्या बद्दल त्यांनी केलेलं
काम, देशासाठी दिलेलं
योगदान,साधं राहणीमान,कलेची आवड अश्या
अनेक गुणांमुळे
त्यांच्याबद्दल आदर होताच
पण त्यांनी कठीण
संघर्ष करून मिळवलेले
यश मला नेहमी
प्रेरणा देणारं वाटायचं.कधीतरी
ह्या व्यक्तीला आपल्याला
भेटता यावे म्हणून
माझे प्रयत्न सुरू
झाले.
त्यांच्या ऑफिस आणि
पी ऐ बरोबर
माझा संपर्क सुरू
झाला.’मी कलाम साहेबांना
भेटण्यासाठी दिल्लीला कधीही येऊ
शकतो' हा माझा
निरोप कलाम साहेब
यांच्या पर्यंत पोचल्यावर
"खास मला भेटण्यासाठी
खर्च करून तुम्ही
दिल्लीला येऊ नका.तुम्ही तुमच्या इतर
दुसऱ्या कुठल्या कामासाठी कधी
दिल्लीत आलात आणि
मी दिल्लीत असेल
तर तुम्हाला मी
जरूर भेटेन " असं
उत्तर कलाम साहेबांच्याकडून
मिळाले.ते ऐकून
वाटलं आपल्यामुळे कुणाला नुकसान
नको म्हणून माझ्या
सारख्या सामान्य व्यक्तीच्या पैश्याचा,वेळेचा इतका विचार करणारा हा
माणूस शून्यातून मोठा
झाल्यामुळे त्यांना जाणीव आहे.
नाहीतर एक महाभाग
दिल्लीत मंत्री असणारा महाराष्ट्रातील
मराठी नेता, ज्याचा
मला काही वर्षांपूर्वी
कायम लक्ष्यात राहीन
असा अनुभव आला.
मी जवानांच्यासाठी नेहमी
बॉर्डरवर जाऊन मोफत
शो करतो म्हणून तोंड भरून
माझं कौतुक करत
ह्या नेत्याने सियाचेनला
बॉर्डरवर जवानांच्यासाठी
शो करायला जात
असताना काही मदत
लागली तर नक्की
सांगा असे सांगितले.मी त्यांना
माझ्या टीमची फ्लाईट तिकिटे
एअर इंडिया किंवा
इतर कुठल्याही विमान
कंपनी कडून स्पॉन्सर
म्हणून मिळवून देण्याची विनंती
केली.
त्या साठी या
नेत्याने,जो महाराष्ट्रात
नेहमी येत असतो,त्याने मला माझ्या
कामासाठी दिल्लीला भेटायला बोलावले.तिथे गेल्यावर
”मी तुमचं
काम नक्कीच करून
देतो तुम्ही काळजी
करू नका" असं
आश्वासन त्याने दिले.हेच
वाक्य तो फोनवर
किंवा मुंबईत त्याच्या
घरी मी भेटलो
असतो तरी सांगू
शकला असता.पण
माझा वेळ,पैसा
याची त्याला काय
किंमत असणार.जसजसे
माझे निघायचे दिवस
जवळ येत होते
तसा मी पुन्हा
संपर्क साधल्यावर ह्या नेत्याने
पुन्हा एकदा मला
भेटायला दिल्लीला बोलवले आणि
सांगितले ”आता तुम्ही
तुमचे पैसे खर्च
करून फ्लाईट तिकिटे
काढा मी तुम्हाला
नंतर पैसे देतो".
ऐनवेळी फ्लाईट तिकिटे काढल्यामुळे मला ती
जास्त महाग पडली
आणि डायरेक्ट फ्लाईट
मिळालीच नाही.कार्यक्रम
करून मी आल्यानंतर चार
महिने सतत फोन
केल्यानंतर ह्या दानशूर
नेत्याने आणि त्याच्या
पी ऐ ने
उत्तर दिले " आम्ही
बोललो होतो तिकिटे
देऊ पण तसं लिहून
तर दिलं नव्हतं
ना?". हे असं
उत्तर ऐकून मी
संतापून विचारले "जर फ्लाईट
तिकिटे देणं जमणार
नव्हते तर आधी
दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट
सांगायचं होतं,मला
झुलवत ठेवून,खोटी
आश्वासने का दिली?
दोनदा दिल्लीला जाण्याचा
खर्च, पुन्हा नंतर
महाग मिळालेली फ्लाईट
तिकिटे हा मला
विनाकारण बसलेला भुर्दंड.
त्यामुळे मी हे
मीडिया समोर सगळं
सांगणार आहे” असं सांगताच
माझा लाखो रुपये
तिकिटाचा खर्च
झाला असताना द्यायची
म्हणून एक किरकोळ
रक्कम त्याच्या माणसा
कडून त्या नेत्याने
पाठवून दिली. आश्वासनाचे मोठे
गड दाखवून करी(हाती) अशी चिल्लर
रक्कम देणाऱ्या नेत्याची
’चमडी जाय पर
दमडी ना जाय’ अशी वृत्ती पाहून खात्री
पटली की यांना
कसलं आलंय देशप्रेम
आणि दिलेल्या शब्दाची
लाज.म्हणून त्याने
दिलेली ती रक्कम
’जनतेचा पैसा जनतेला
द्यावा’ असं ठरवलं आणि
पुण्यातील गरीब गरजू
मुलांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून
दिली.
जेंव्हा जेंव्हा ह्या
नेत्याला मुलाखती मधून देशाबद्दल,
देशातील जनते बद्दल
त्याला असणारी तळमळ व्यक्त करताना पाहतो
तेंव्हा त्याचा तो अभिनय
पाहून मला नेहमी
वाटत राहतं हा चुकून
राजकारणात आहे.अभिनेता
बनून त्याने ऑस्कर
नक्कीच मिळवला असता. पण
या नेत्याला टिव्ही
वर पाहिलं की
माझ्या वेळेची,पैश्याची काळजी
करणारे कलाम साहेब
मला हमखास आठवतात.
मी जेंव्हा
जेंव्हा दिल्लीत कामानिमित्त गेलो
तेंव्हा चौकशी केली असता
कलाम साहेब दिल्ली
बाहेर कार्यक्रमांसाठी गेलेले
असायचे आणि जेंव्हा
त्यांचे मुंबईत येणे झाले
तेंव्हा एकदा मीही
मुंबईच्या बाहेर होतो त्यामुळे
त्यांची भेट होऊ
शकली नाही.
2015 मध्ये मात्र ही
भेट झाली. कलाम
साहेबांचा मुंबईत येण्याचा कार्यक्रम
ठरला आणि मला
तसा त्यांच्या कडून
मेसेज आला.रात्री
8 वाजताची मुंबईतील राजभवन मध्ये
मला भेटीची वेळ
देण्यात आली.नशीब
माझं चांगलं की
मी तेंव्हा मुंबईतच
होतो. मनातून खूप
आनंद झाला की
एकदाची कलाम साहेबांची
भेट होणार.आपल्या
बरोबर आपल्या काही
कलाकारांनाही घेऊन जावं
म्हणजे आपल्या निमित्ताने त्यांनाही कलाम
साहेबांना भेटण्याची संधी मिळेल
असे मला वाटले.
मी कलाम साहेबांच्या
पी ऐ कडून
तशी परवानगी मिळवली
कारण माजी राष्ट्रपती
असल्याने त्यांचा एक प्रोटोकॉल
पाळावा लागतो.
माझ्या बरोबर चार व्यक्तींची
परवानगी मिळाली होती म्हणून
मी काही ओळखीच्या
मराठी कलाकारांना, कलामांना
भेटायची इच्छा असेल तर
विचारून बघावे म्हणून फोन
केले.एका मराठी
अभिनेत्रीने फोनवर मला उत्तर
दिले "महेशजी कलामांना भेटून
काय उपयोग.आता
तर ते काम
पण करत नाहीत
रिटायर्ड झालेत".हे उत्तर
ऐकून माझ्या आतून
ठिणगी उडाली.
मी संयम दाखवत
उत्तर दिले "रिटायर्ड
कुठं झालेत अजूनही
ते बिझी
असतात" त्यावर पुन्हा तिने
अक्कल पाजळली "ते
ठीक आहे पण
आपलं काही काम
नाही तर का
जाऊन भेटा त्यांना.मग मात्र
मला राहवले नाही
कारण माझ्या आत
पेटलेल्या ठिणगीचा भडका उडाला
होता "तुला नक्की
माहिती आहे का
ऐ पी जे
कलाम कोण आणि
किती मोठी व्यक्ती
आहे".
माझं ऐकुन घेत
तिने अकलेची दिवाळखोरी
दाखवली ”असं कसं
महेशजी, मला माहिती
आहेत ते.त्यांनी
खूप हिट सिनेमे
लिहिले आहेत दिवार,शोले.
पण आता त्यांना
सलमानचे वडील म्हणूनच
ओळख आहे बाकी
काही नाही". तिने
नाव घेतलेल्या त्या
दीवार वर तिचं
डोकं आपटलं तरी
उपयोग होणार नाही
हे समजून माझ्या
आत पेटलेल्या ठिणगी
चे शोले मी
कसेबसे थंड करत
पुढे अधिक तिला
स्पष्टीकरण देत
बसलो नाही.
हेच जर मी
सलमानने भेटायला बोलवलं आहे
इतकं जरी सांगितल
असत तर "ओह
माय गॉड,सल्लू.आय लव
हिम"असं म्हणत
ओठांचे विविध आकार करत
मुके,फ्लायींग किस
देत ती नाचली
असती आणि सलमान
तिच्या जिवाभावाचा असल्याचं दाखवत
त्याच्यावरचे प्रेम उफाळून बाहेर
आले असते.फेस
व्हॅल्यू ,चेहरा किती फेमस
आहे यावरून एखाद्या
व्यक्तीच्या कामाची मोजमाप करणाऱ्या
बेअक्कल लोकांची मला नेहमीच
कीव येते.आणखी
एका मराठी नटाला
विचारल्यावर "माझ्याकडे मित्र येणार
आहेत त्यामुळे रात्री
आम्ही जरा सगळे
बसणार आहोत.” असं
सांगत त्यानेही
नकार दिला.
माझे मित्र
अभिनेते विजू खोटे
यांना सांगितल्यावर कलाम
साहेबांना भेटायला मिळणार म्हणून
त्यांचे शूटिंग असतानाही दिग्दर्शकाला विनंती करून विजू
खोटे लवकर निघाले.आणखी दोन
कलाकार माझ्या बरोबर होते.
भेट घेण्यासाठी
राजभवनकडे जाताना, वाटेत असतानाच
मला कलाम साहेबांच्या
पी ऐ चा
मेसेज आला की
त्यांचे दिल्लीचे फ्लाईट दोन
तास उशिराने मुंबईत पोचणार आहे
त्यामुळे त्यांना राजभवनवर पोचायला
अंदाजे रात्रीचे दहा वाजणार.आम्हाला सव्वा दहा
किंवा साडे दहाला
ते भेटणार हे
ही त्यांनी खात्रीने
सांगितले.
अर्ध्या रस्त्यात आम्ही
पोचलो होतो. बरोबरच्या
कलाकारांना मी उशिरा
भेट होणार आहे
सांगितल्यावर त्यांची तगमग सुरू
झाली.”आता तीन
तास परत वाट
बघायची का?जाऊयात
परत घरी.आल्यावरही
ते जर नाही
भेटले तर? त्यांची कुरबुर ऐकुन,
आईच्या पोटात नऊ महिने
ह्यांनी कसा काय
दम काढला असेल
असा मला प्रश्न
पडला. ”ज्याला थांबायचे ते
थांबा ज्याला जायचे
ते निघा”असं मला
सांगावे लागले.तेव्हा विजू
खोटे मला गमतीने
म्हणाले "तीन तास
वाट बघितल्यावर प्रत्येकी
पाच लाख मिळणार
असतील तर हेच
कलाकार तीन तास
काय रात्रभर वाट
पहात बसतील.इथून
पुढे महेश तू
लक्ष्यात ठेव ज्यांची
योग्यता नाही अश्या
या नाटकी लोकांना
कधीच कुठे घेऊन
जाऊ नकोस.तुझा
तूच एकटा जाऊन
भेटत जा.
समोरचा भेटणारा व्यक्ती
कर्तृत्वाने किती मोठा
आहे याचं जर
भान नसेल आणि
तुझ्या मुळे सहज
भेट होतेय म्हणून
किंमत नसेल तर
तू अश्यांना सरळ.....
मार".
राजभवनात पोचल्यावर तिथे
एका मोठ्या हॉलमध्ये
काही मोठमोठी मंडळी
कलाम साहेबांच्या भेटीसाठी
आल्याचे दिसले.आम्हाला त्या
हॉल शेजारी असलेल्या
एका खास दालनात
बसविण्यात आले जिथं
फक्त आम्हीच होतो.आमच्यासाठी ही स्पेशल
ट्रीटमेंट पाहून जरा भारी
वाटलं.मग चहाही
आला.
कलाम साहेब आल्यानंतर हॉल
मधील लोकांना भेटून
आम्ही बसलो त्या
ठिकाणी आले.ते
येताच आम्ही उठून
उभे राहिल्यावर sorry to keep u waiting असं म्हणत
त्यांची फ्लाईट लेट पोचल्यामुळे
भेटायला उशीर झाल्याबद्दल
दिलगिरी व्यक्त करत त्यांनी
मनाचा मोठेपणा दाखवला.
आम्ही त्यांच्या समोरच्या सोफ्यावर
बसलो होतो त्यांनी
मला जवळ बोलवून
त्यांच्या शेजारच्या सोफ्यावर बसायला
सांगितले .मी हात
जोडून त्यांना नमस्कार
करीत आशिर्वादासाठी खाली
वाकलो तेंव्हा मला
उठवत माझे दोन्ही
हात हाती घेत
पुन्हा त्यांनी मला शेजारच्या
सोफ्यावर बसवत गप्पांना
सुरुवात केली. बॉर्डरवर जाऊन
जवानांच्या साठी कार्यक्रम
केल्याचे त्यांनी विशेष कौतुक
करीत कार्यक्रमात कोण
कोणते डान्स असतात
असं विचारल्यावर.
मी सगळ्या प्रकारचे डान्स
असतात असं सांगत
उडती आणि तरुणांच्या
आवडीची गाणी पण
असतात असं थोडंसं
संकोच करत सांगितल्यावर त्यांनी
उत्तर दिले त्यात
चूक काहीच नाही
तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून लोकांचं
मनोरंजन तर करत
आहातच पण सामाजिक कामासाठी पण
तुमच्या शो मधून
मदत करता हे
जास्त महत्त्वाचं आहे.त्यांनी केलेल्या कौतुकामुळे
मी सुखावलो.
कलाम साहेबांनी
माझा कार्यक्रम पहावी
अशी इच्छा असल्याचे
मी त्यांना सांगितल्यावर
त्यांनी लगेच होकार
दिला आणि तुमचं
सगळं ठरलं की
मला कळवा असं
सांगितलं.
भेटून परत निघताना
इतक्या थोर व्यक्तीने
आशिर्वादासाठी माझ्या डोक्यावर ठेवलेला
हात,त्या हाताचा
स्पर्श एखाद्या अत्तराचा सुगंध
वर्षानुवर्ष मनात दरवळत
रहावा तसा आजही
मला मोहरुन टाकत
आहे आणि जाणीव
करून देत आहे
की माणसाने आपला
मोठेपणा, कर्तृत्व नेहमी कामातून
दाखवायचं असते.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.