भरत जाधव सही अभिनेता आणि प्रेक्षकांना आपला वाटणारा खरा ’स्टार' आहे
जुन्या पिढीतील ज्या काही
दिग्गज कलाकारां बरोबर काम
करताना कलाकार म्हणून त्यांची
कामावरची श्रद्धा, प्रामाणिकपणा ,झोकून
द्यायची वृत्ती मी पाहिली
आहे. त्याच गुणांचे
संस्कार ज्याच्यावर झालेले आहेत
असा मधल्या पिढीतील
एक सही अभिनेता
म्हणजे भरत जाधव.
भरतची आणि माझी
ओळख,मैत्री 2000 सालापासूनची.तेंव्हा तो फार
नावारूपाला आला नव्हता.त्याचे स्ट्रगल चालू
होते त्यावेळी जी विनम्रता
त्याच्या स्वभावात होती, जे
वागणं बोलणं होतं
त्यात तो मराठी
सिनेमाचा स्टार झाल्यानंतरही अजिबात
बदल झाला नाही.
नाहीतर एक सिनेमा
हिट झाल्यावर हवेतच
तरंगणारे स्वयंघोषित स्टार,सुपरस्टार
मी अनेक पाहिलेत
ज्यांना एक हिट
सिनेमा देऊनही ते यश
पुढे टिकवता आले
नाही.
भरत नाटकामध्ये ही स्टार
होता आणि सिनेमामध्येही.पण निर्मात्याला
त्याने कधीच अडचणीत
आणून अवास्तव मागण्या
पूर्ण करून घेतल्या
नाहीत.कित्येकदा तर
शूटिंगला लागणारे कपडे पण
त्याने स्वतःचे वापरले,त्याची
स्वतःची गाडी तो
सिनेमाचा हिरो असूनही
त्याने इतर कलाकारांसाठी
म्हणून वापरायला निर्मात्याला दिलेली मी स्वतः
पाहिले आहे.
2000 मध्ये
तेंव्हा नव्याने सुरू झालेल्या
अल्फा टीव्ही म्हणजे
आताचे झी मराठी
चॅनेल साठी मी
’अफलातून’ या मालिकेची
निर्मिती दिग्दर्शन करीत होतो
त्यात विजू मामा(
अभिनेता विजय चव्हाण)
मुख्य भूमिकेत होते.तेंव्हा विजू मामाचे
'तू तू मी
मी ' हे मराठी
नाटक चालू होते.त्यात अंकुश चौधरी,भरत जाधव
हे देखील होते.
अंकुश, विजुमामा यांनी आधीही
माझ्या दूरदर्शन मालिका,कार्यक्रमात
काम केले होते.पण भरत
बरोबर काम करण्याची
संधी आली नव्हती.माझ्या मालिकेच्या शूटिंगसाठी
विजू मामा पुण्यात
आले की रात्री
ते नाटकाचे शो
करायचे, त्यामुळे त्यांच्या त्या
नाटकातील भरत बरोबर
नेहमी माझी भेट
व्हायची.पुण्यातील टिळक स्मारक
शेजारील बादशाही हॉटेलमध्ये आमच्या
चहा बरोबर गप्पा
रंगायच्या.तिथेच पुढे ओळीने
कपड्याची अनेक दुकाने
आहेत, तिथे माझा
एक गुजराती मित्र
देवेंद्र पटेल याचे
दुकान होते, त्या
दुकानात आम्ही जाऊन नवीन
आलेले ड्रेस बघायचं
काम फक्त करायचो.
ते विकत घेणे
परवडणारे नसायचे. पण माझा
तो गुजराती मित्र
आम्हाला आवडलेले कपडे बाजूला
काढून ठेवायचा आणि
मला शूटिंग साठी
वापरायला द्यायचा.मग तेच
कपडे भरत अंकुश,विजू मामा
यांना मी घालायला
देऊन नंतर परत
करायचो.गुजराती असूनही या
माझ्या मित्राने कधीच माझ्या
कडून पैसे घेतले
नाहीत उलट दुकानात
गेल्यावर तो आमच्यासाठी
चहा नाश्ता मागवित
असे.त्यावर गमतीने
विजूमामा, भरत त्याला
म्हणायचे असा नुकसानीचा
धंदा केला तर
परत गुजरातला जायची
वेळ येईन तुमच्यावर.
माझ्या ’अफलातून’ मालिकेत एका एपिसोड
मध्ये भरत जाधव
ने काम केले
होते त्यावेळी त्याला पाचशे रुपये
मानधन मी दिले
होते.
भरतने कधीच माझ्याकडे
पैश्याबाबत कसली विचारणा
केली नाही.भरत,
विजू मामा,विजू
खोटे असे आणखी
काही कलाकार ज्यांनी
पैश्यापेक्षा काम आणि
मैत्री जपली .काही असेही
अभिनय सम्राट मी
पाहिलेत की भूमिका,स्क्रिप्ट याची विचारणा
करण्याआधी व्हिटॅमिन एम.(money) किती
मिळणार? याची त्यांना
उत्सुकता असते आणि
शूटिंगला कॅमेरासमोर उभे राहिल्यावर
एक मोठा डायलॉग
बोलायला त्यांना घाम फुटतो.अश्यांना व्हिटॅमिन एम.
ची नाहीतर व्हिटॅमिन
सी. ची जास्त
गरज असते.
’अफलातून’ मालिकेनंतर मी झी
साठी ’रेशीमगाठी’ या मालिकेसाठी
दोन भागाची एक
स्टोरी केली होती
त्यात निळूभाऊ फुले,अंकुश चौधरी याची
मुख्य भूमिका होती.त्यातही मी भरतला
एक खूपच छोटी
भूमिका दिली होती
ज्यात तो गावातील
एक मुका तरुण
असतो ज्याच्या हातून
चूक घडते आणि
मग त्याला शिक्षा
देण्यासाठी गावचे पाटील निळूभाऊ
यांच्या समोर उभे
केले जाते. एकच
सीन असूनही, ज्यात
एकही डायलॉग नाही
तरीही कुठलीही तक्रार
न करता केवळ
निळूभाऊ यांच्या समोर उभं
रहायला मिळतं आहे त्यातच
आनंद मानून भरतने
तो एक सीन
केला.पण मलाच
हुरहूर लागून राहिली की
मी त्याला मोठी
भूमिका देऊ शकलो
नाही. पण भविष्यात
त्याची परतफेड करायची हे
मी तेंव्हाच मनाशी
ठरवले.
’सही रे
सही’ हे भरतचे
नाटक रंगभूमीवर आले आणि
त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढून
तो नाटकात स्टार
झाला. त्यानंतर त्याला
हिरोची भूमिका मिळालेला 'चालू
नवरा भोळी बायको'
हा सिनेमा सुपरडुपर
हिट होऊन खऱ्या
अर्थाने भरत एका
रात्रीत सिनेमाचाही स्टार
झाला.मग नाटक,चित्रपट हे सुरूच
राहिलं आणि यशाच्या
शिखरावर तो पोचला.त्या दरम्यान
माझेही तीन चार
चित्रपट झाले.पण
त्यात भरत नव्हता.मराठी तारका शो
आणि इतरही माझे
कार्यक्रम चालू होते.
आम्ही दोघे आपापल्या
परीने बिझी होतो
पण स्टार झाल्यावरही
भरतला भेटल्यावर त्याला
’भरतजी’अशी हाक
मारायची वेळ यावी
असं अंतर,वर्तणूक,मोठेपणा भरतने कधीच
दाखवला नाही.
जुनी मैत्री तशीच त्याने
जपली.मराठी चित्रपट
सृष्टीला 75 वर्ष झाल्याच्या
निमित्ताने मी पुण्यात
’मराठी तारे तारका’ हा नृत्याचा कार्यक्रम आयोजित
केला होता ज्यात
मराठीतील प्रसिद्ध 20 हिरो 20 हिरोईन सहभागी
झाले होते.त्यावेळी
पण भरत बिझी
असूनही त्याने डान्स रिहल्सल
साठी पुरेसा वेळ
देऊन कार्यक्रमात सहभागी
झाला.अर्थात सर्व
कलाकार कसलीच अपेक्षा न
करता एकत्र आले.
निळूभाऊ हे देखील
माझ्या इच्छे खातर एका
नृत्यात सहभागी झाले.अपवाद
फक्त एकच अभिनयात
महागुरू असलेला एक महान
नट.या नटाने
वर्षा उसगावकर यांच्या बरोबर त्याच्याच
एक हिट सिनेमातील
हिट गाण्यावर नृत्य
करावे म्हणून विचारणा
करण्यासाठी मी
त्याला फोन केला.तेंव्हा वर्षा उसगावकर
यांच्या ऐवजी या
नटाने त्याच्या अभिनेत्री
असलेल्या पत्नी बरोबरच तो
नृत्य करेल अशी
अट घातली आणि
त्यासाठी लाखो रुपये
मागितले.
खरं तर त्यावेळी
भरत यशाच्या शिखरावर
होता त्यामुळे त्याला
सिनेमांसाठी, कार्यक्रमासाठी लाखो रुपये
मानधन मिळत असतानाही
त्याने आणि इतर
कलाकारांनीही कुठे पैसे
मागायचे कुठं संबंध
जपायचे हे ओळखलं
होते आणि या
कार्यक्रमा मधून मराठी
चित्रपटसृष्टीत प्रथमच 40 कलाकार एकत्र एका
रंगमंचावर येणार आणि तो
इतिहास घडणार म्हणून सर्वजण
घरचं कार्य समजून
सहकार्य करीत होते
. ह्या महान महागुरू
नटाला लाखो रुपये
देण्या पेक्ष्या लाख मोलाचे
इतके सगळे कलाकार
आपल्या पाठीशी आहेत त्यातच
मी समाधान मानले.
’लाडी गोडी’ या माझ्या मल्टीस्टार चित्रपटात
एका छोट्या विनोदी
भूमिकेसाठी माझ्या डोक्यात भरतचे
नाव आले.पण
वाटले तो आता
स्टार आहे तेंव्हा
अशी छोटी भूमिका
करायला हो म्हणेल
का?आणि तो
इतका बिझी आहे
की त्याच्या मला
पाहिजे त्या तारखा
शुटींगाठी मिळतील का? अशी
शंका मनात होती पण
तरीदेखील मी त्याला
फोन केला आणि
सगळं सांगितल्यावर "महेश,किती वर्षांनी
आपण पुन्हा एकत्र
काम करणार आहोत.तुझ्याकडे काम करताना
मी रोल छोटा
का मोठा कधीच
बघणार नाही.तुझ्या
ह्या मल्टीस्टार सिनेमात
तू देशील
ते काम मी
करीन.मलाही ह्या
सिनेमाचा एक भाग
होता होईल आणि
तुला पाहिजे त्या
तारखा ऐडजस्ट करून
मी देईन".
भरतने होकार दिल्यामुळे मी
त्याची भूमिका वाढवली आणि
त्याप्रमाणे त्याने शूटिंगसाठी मला
तारखा दिल्या. दुसऱ्या
एका चित्रपटाचे शूटिंग
करून तर कधी
रात्रीचा नाटकाचा शो करून
माझ्या शूटिंगसाठी तो कधी
मुंबई कधी कोल्हापूर
वरून पुण्यासाठी निघायचा.निघताना मला फोन
करीत असे "महेश
मी निघतोय तू
काळजी करू नको,पोचतो मी व्यवस्थित".
माझे कलाकार जो
पर्यंत शूटिंगच्या आधल्या दिवशी
पोचत नाहीत तो
पर्यंत नेहमी मला टेंशन
राहतं.
भरतने कधीही मध्यरात्री हॉटेल
वर पोचल्यावर मला
किंवा इतर कुणाला
उठवून झोपमोड केली
नाही की कसली
मागणी केली नाही.वाटेत कुठेही थांबून
तो खाऊन यायचा
आणि कधी त्याच्यासाठी
रुम मध्ये जेवणाचा
डबा ठेवला तर
पोचल्यावर जेवण गरम
करून द्या असेही
म्हणाला नाही. शूटिंगच्या ठिकाणी
पण मला जेवायला
अमुक एक पदार्थ
पाहिजे असा हट्ट
नाही.
’लाडी
गोडी’ह्या माझ्या
चित्रपटात एकूण 22 प्रसिद्ध कलाकार
होते.शूटिंग सुरू
होऊन काही दिवस
झाले आणि मला
आर्थिक अडचणी येऊ लागल्या.शूटिंग सुरू ठेवायचे
तर पैसे लागणार
आणि थांबवलं तर
पुन्हा इतक्या सगळ्या बिझी
कलाकारांच्या तारखा एकत्र जुळवून
आणणं कठीण जाणार.पण ठरवलं
या आधी या
सिनेमात काम करणाऱ्या
काही कलाकारांच्या बरोबर
मी काम केले
आहे.
काहींनी केले नाही
तरी त्यांना माझ्याबद्दल
खात्री आहे की
मी पैसे कुणाचे
बुडवणार नाही.म्हणून
सर्व कलाकारांना मी
विनंती केली की
त्यांच्या कामाचे पैसे मी
नंतर देईन. शूटिंगच्या
वेळी भरतने नवीन
घेतलेल्या स्वतःच्या मेकअप व्यान
मध्ये निळूभाऊ यांचे
पाय लागावे
म्हणून विनंती केली आणि
भाऊ जेंव्हा त्याच्या
मेकअप व्यान मध्ये
बसले तेंव्हा भरतचा
चेहरा आनंदाने खुलला
होता.इतर कलाकारांनाही
भरतने त्याच्या मेकअप
व्यान मध्ये मेकअप,आराम करायला
कधीच आडकाठी केली
नाही उलट मी
त्याला चेष्टेने म्हणायचो ”भरत
या सिनेमात तुला
घेण्याचं कारण म्हणजे
एकतर तुझ्या मेकअप
व्यान मुळे माझी
इतर कलाकारांची फुकट
सोय होते आणि
तुझे जेवणाचे पण
नखरे नसतात.”त्यावर
विजू खोटे त्याला
गमतीने सांगायचे
" भरत आता महेशच्या
पुढच्या सिनेमाच्या वेळी तो
तुला हॉटेल मध्ये
नाही ठेवणार.तू
तुझ्या मेकअप व्यान मध्येच
झोपायचे आहे".त्यावर भरत
मात्र जोर जोरात
हसायचा.
एकदाचे शूटिंग पार पडले.
काही महिने गेले आणि
माझा सिनेमा विकला
गेला नी पैसे
आले ज्यांनी ज्यांनी
मला कधीच पैश्याची
विचारणा केली नाही
त्यांचे मुद्दामहून जास्त पैसे
त्याबरोबर गिफ्ट देऊन मी
सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार
मानले. भरतला फोन
करून त्याच्या नाटकाचा
शो होता तिथे
मी त्याला भेटायला
गेलो.तो मेकअप
रुममध्ये तयार होत
होता त्याला मी
सिनेमा विकला जाऊन पैसे
आल्याचे सांगितले आणि त्याला
द्यायला पैशाचे पाकीट पुढे
केल्यावर त्याने ते घ्यायला
नकार देत सांगितले
"महेश, कश्याला लाजवतोय.
मी तुझ्याकडे कधी पैसे
मागितले का? आणि
या सिनेमात तू
मला निळूभाऊ फुले,
सुलोचना दीदी यांच्या
बरोबर काम करायची
संधी दिली,त्यांचे
आशीर्वाद लाभले तेच मला
आयुष्यभर पुरेल". मी खूप
आग्रह केला तेंव्हा
त्याने फक्त एक
रुपया मागितला.पण
मी माझा हट्ट
सोडला नाही आणि
जबरदस्तीने पाकीट त्याला घ्यायला
लावले.
’दादागिरी’ ह्या दादा
कोंडके यांच्यावर मी केलेल्या
कार्यक्रमातही भरतने एका धमाल
गाण्यावर नृत्य केले होते
त्यानंतर मी त्याला
’वन रुम किचन’ ह्या माझ्या सिनेमात काम
करण्यासाठी विचारले. खरं तर
तेंव्हा भरतचे विनोदी चित्रपट
चालत असल्यामुळे त्याची
इमेज विनोदी नट
अशीच झाली होती.पण माझ्या
सिनेमात गंभीर भूमिका करायला
तो आनंदाने तयार
झाला. तेंव्हाही त्याने
मला पाहिजे त्या
तारखा शूटिंगसाठी दिल्या.पैश्याबाबत फोनवर
विचारल्यावर नेहमी प्रमाणे "महेश ,आवाज ऐकू
येत नाही तुझा,
कळत नाही रे
तू काय बोलतोय,नंतर फोन
कर” असं
बोलून व्यवहाराचे बोलणे नेहमी
प्रमाणे भरतने टाळलं.
त्याच्या आणि इतर
सर्व कलाकारांच्या सहकार्यामुळे
फक्त 19 दिवसात ’वन रुम
किचन’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण
झाले.शूटिंग करताना
भरत स्कूटर वरून
कामावर जाताना,रिक्षा चालवताना असे
रस्त्यावर शॉट घ्यायचे
होते.पुण्यात गर्दीच्या
ठिकाणी शूटिंग करत असताना
मेकअप व्यान साठी जागा
मिळणं अशक्य.पण
अश्यावेळी मात्र भरत ने
माझी अडचण ओळखून
रस्त्याच्या बाजूला एखादी गल्ली
दिसली की तिथेच
कोणी येत जात
नाही ते पाहून
पटकन कपडेही बदलले
आहेत.त्याने ’वन
रूम किचन’मध्ये घेतलेली
मेहनत सिनेमा पाहताना
दिसून येते अनेक
लोक मला अजूनही
सिनेमा टिव्ही चॅनेलवर पाहिला
की सांगतात.या
सिनेमातील भरतचे काम पाहून
डोळ्यात पाणी येते.त्याला कारण म्हणजे
भरत ’सही अभिनेता
असलेला आणि प्रेक्षकांना
आपला वाटणारा खरा ’स्टार
आहे.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.